संतोष गोलेटी
सिरोंचापासून तेलंगणा राज्यातील कालेश्वर-महादेवपुर चौपदरी मार्गाचे काम मागील पाच महिन्यापासून सुरु आहे. याच मार्गावर कन्वर्ट पुलाची बांधकाम करण्यात येत आहे. मात्र, पुलाच्या बांधकामासाठी मोठमोठे खड्डे खोदून ठेवण्यात आले आहे. मात्र या कामादरम्यान कोणतेही फलक लावण्यात न आल्याने या मार्गावर अपघाताचे सत्र वाढले आहे. असाच प्रकार शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडून आला. चारचाकी वाहन खड्ड्यात उलटल्याने काही इसम जखमी झाल्याची माहिती आहे. रस्त्याची दैनावस्था होऊन अपघाताचे प्रमाण वाढले असतांना संबंधित विभाग मात्र कुंभकर्णी झोपेचे सोंग घेऊन असल्याने वाहनधारकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राज्यासह जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील सिरोंचा तालुका क्षेत्र तेलंगणा राज्य सीमेलगत वसले आहे. गोदावरी नदीवर पूल निर्मिती होताच या भागांतील नागरिकांचा तेलंगणा राज्याशी अधिकच संपर्क वाढला आहे. दरम्यान मागील 5 महिन्यांपासून सिरोंचा-कालेश्वर- महादेवपूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. मात्र सदर बांधकाम कासव गतीने सुरु असल्याने दररोज या मार्गावर अपघाताचे सत्र सुरु आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. सिरोंचा- कालेश्वरम-महादेवपूरसह हाच महामार्ग हैद्रराबादपर्यंत पोहोचतो. त्यामुळे सदर महामार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे संबंधित विभागाने रस्ता बांधकामाला गती देऊन बांधकाम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी प्रवाशांसह वाहतूकदारांद्वारे होत आहे
अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी
महामार्गाच्या एकाच बाजूने मार्गक्रमण –
सिरोंचा-महादेवपूर कालेश्वर राष्ट्रीय महामार्ग क्र. 353-सी या मार्गावर तेलंगणा राज्यातील कालेश्वरम देवस्थान वसले आहे. सिरोंचा तालुकास्थळापासून अवघ्या 8 किमी अंतरावर हे देवस्थान आहे. याच मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील 5 महिण्यांपासून सुरु आहे. परिणामी या मार्गाची एक बाजू खोदून ठेवली असून दुसऱ्या बाजूने मार्गक्रमण सुरु आहे. यातच कलवर्ट पुलाच्या बांधकामासाठी खोदकाम करण्याचे काम सुरु असतांना फलकही लावण्यात आलेले नाही. यामुळे अपघातात वाढ दिसून येत आहे. यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या कामादरम्यान दिशादर्शक फलक लावण्यात न आल्याने चारचाकी, अवजड वाहनधारकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. कामाच्या संथगतीमुळे वाहनधारकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे.
खोदकामाचे खड्डे देताहेत अपघातास आमंत्रण –
या महामार्गावर मागील अनेक महिन्यांपासून अपघाताचे सत्र सुरु आहे. मागील मे महिन्यात 24 मे रोजी कालेश्वरम येथून सिरोंचाकडे येणारी दुचाकी समोरून येणाऱ्या अवजड वाहनाला साइड देताना खोदकामातील खड्यात पडल्याने दुचाकीवरील इसम गंभीर जखमी झाला होता. परत गुरुवारी, (दि.19) रात्री चारचाकी वाहन पुलासाठी खोदल्या खड्डात उलटून तीन प्रवासी जखमी झाले. विशेषतः बांधकाम सुरु असतांना यासंदर्भात फलक लावण्यात न आल्याने अपघातात वाढ होत आहे. मागील काही महिन्यात या मार्गावर अनेक किरकोळ अपघात घडले असून याची प्रशासकीय स्तरावर नोंद नाही. महामार्गावरील खड्डे अपघातात आमंत्रण देत असतांना संबंधित विभाग मात्र मुंग गिळून असल्याने प्रशासन इतकी असंवेदनशील कशी? असा उद्विग्न सवाल उपस्थित केल्या जात आहे.