गणेश राठोड
तालुका प्रतिनिधी /उमरखेड
पिंपळवाडी येथील गरीब शेतकरी शामराव राठोड यांचा मुलगा दिनेश राठोड याची महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड झाल्यामुळे गावकऱ्यांनी आनंदाने भरून गेलेला स्वागत सोहळा आयोजित केला आहे. दिनेश या यशस्वी प्रवासामुळे केवळ त्याचे कुटुंबच नाही, तर संपूर्ण पिंपळवाडी गाव उत्साहाने ओतप्रोत भरले आहे. त्याच्या या कर्तृत्वाबद्दल गावातील प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटत आहे.
दिनेश यांचे बालपण अत्यंत साधेपणात गेले असून, त्याच्या घराची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. असे असूनही त्याच्या आई-वडिलांनी त्याच्या शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी खूप कष्ट घेतले. गरीब शेतकरी कुटुंबात वाढलेला दिनेश राठोड हा मेहनती, चिकाटी, आणि जिद्दीचा प्रतीक ठरला आहे. त्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून महाराष्ट्र सुरक्षा दलामध्ये स्थान मिळवले, ज्यामुळे त्याचे कुटुंब, नातेवाईक, आणि मित्रमंडळींनी त्याचा गौरव केला आहे.
गावातील नागरिकांनी रांगोळी काढून, ढोल-ताशाच्या गजरात हिनेश चे स्वागत केले. गावातील प्रतिष्ठित मंडळींसह सर्व नागरिकांनी एकत्र येऊन त्याच्या या यशाचा आनंद साजरा केला. स्वागत सोहळ्यात गावातील ज्येष्ठ मंडळींनी दिनेश ला आशीर्वाद दिले, त्याच्या पुढील जीवन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आणि त्याने गावाचे नाव उज्ज्वल केले याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
शाळेतील शिक्षक, त्याचे मित्र, तसेच अनेक तरुण वर्ग त्याच्याकडून प्रेरणा घेत आहेत. त्याच्या यशामुळे अनेकांना विश्वास वाटत आहे की कष्ट, सातत्य आणि ध्येय साध्य करण्याची उमेद असेल तर कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होता येऊ शकते.
दिनेश च्या स्वागत सोहळ्यानंतर गावात त्याच्याबद्दल खूप कौतुकाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच्या आई-वडिलांनी त्याच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की, त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला नेहमी प्रोत्साहित केले. त्याच्या आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते, तर वडिलांनी अभिमानाने त्याचे यश पाहिले.
संपूर्ण पिंपळवाडी गावासाठी दिनेश राठेड चा हा यशस्वी प्रवास एक आदर्श ठरला आहे.