सुनील शिरपुरे/यवतमाळ
चंद्रपूर मधील मुल तालुक्यातील बेंबाळ गावातील प्रसिद्ध लेखक तथा कवी अंगुलिमाल मायाबाई उराडे यांना युवा प्रबोधन साहित्य मंच महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थे तर्फे दिला जाणारा युवा महाराष्ट्र आदर्श समाजरत्न भूषण पुरस्कार २०२४ या पुरस्काराकरिता निवड करण्यात आली आहे. लेखक तथा विद्रोही कवी अंगुलिमाल मायाबाई उराडे हे साप, विंचू, पक्षी अशा अनेक मुक्या प्राण्यांना जीवदान देत असतात. गरीब लहान गरजू मुलांना बुक, पेन भेट देणे. हाक देताच वेळोवेळी मदतीला धावून जाणे. अन्यायाविरुद्ध वेळीच बंड पुकारने… हे नित्यनेमाचे त्यांचे काम. त्यांच्या या गौरवशाली व कौतुकास्पद कार्यामुळे त्यांच्यामध्ये असलेली समाजसेवेची धडपड दिसून येते. त्यांच्या याच कार्यामुळे अनेक सामाजिक संघटनांनी साहित्यिक अंगुलिमाल मायाबाई उराडे बेंबाळकर यांना आतापर्यंत काव्य गौरव, काव्य रत्न, उत्कृष्ट साहित्यिक, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे कलावंत, आंतर राज्य काव्य गौरव (गुजरात), डॉ. बाबासाहेब आंबेडकर, समाज सेवा, युवा भुषण, समाजरत्न अशा अनेक पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. अंगुलिमाल मायाबाई उराडे यांच्या सामाजिक कार्याची योग्य ती दखल घेऊन युवा प्रबोधन साहित्य मंच पुणे, महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेच्या वतीने युवा साहित्यिक अंगुलिमाल मायाबाई उराडे बेंबाळकर यांची यावर्षीच्या “युवा महाराष्ट्र आदर्श समाजरत्न भूषण पुरस्कार” करिता निवड केली असल्याचे युवा प्रबोधन साहित्य मंचचे सन्माननीय अध्यक्ष श्री. सागरभाऊ वाघमारे साहेब यांनी निवड पत्रकाद्वारे कळविले आहे. त्यामुळे बेंबाळ गावातील नागरिकांच्या व मित्रमंडळींच्या वतीने अंगुलिमाल मायाबाई उराडे बेंबाळकर यांचे भरभरून कौतुक केल्या जात आहे.
सदर पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील मावळ येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.