वृत्तसेवा : शेजारील राष्ट्र बांगलादेशमधील अशांतता ही आपल्याला स्वातंत्र्य किती महत्त्वाचे आहे याची जाणीव करुन देते, असे प्रतिपादन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आज (दि. १५) केले. ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी चंद्रचूड म्हणाले की, आम्ही १९५० मध्ये स्वातंत्र्याची अनिश्चितता निवडली आणि आज बांगलादेशात जे काही घडत आहे, ते स्वातंत्र्य आपल्यासाठी किती मौल्यवान आहे याची आठवण करून देते. स्वातंत्र्य गृहीत धरणे सोपे आहे, परंतु या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत याची आठवण करून देण्यासाठी भूतकाळातील कथा समजून घेणे महत्त्वाचे आहे. आज सकाळी, मी कर्नाटकातील प्रख्यात गायिका चित्रा श्री कृष्णा यांनी लिहिलेला एक सुंदर लेख वाचत होतो. त्याचे शीर्षक सोंग्स ऑफ फ्रीडम असे आहे. स्वातंत्र्याची कल्पना भारतीय कवितेच्या जडणघडणीत विणलेली आहे, असेही त्यांनी नमूद केले. आरक्षणाविरोधात विद्यार्थ्यांच्या हिंसक निदर्शनेनंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी ५ ऑगस्ट २०२४ रोजी राजीनामा दिला. यानंतर त्यांनी भारतात आश्रय घेतला. हसीना यांच्या राजीनाम्यानंतर बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंवर हल्ल्यांचे सत्र सुरु झाले होते. आता नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्त्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झाले आहे.