तालुका प्रतिनिधी
अवधूत खडककर / यवतमाळ
उमरखेड : दि. 23 आपल्या आजूबाजूला आपल्याला जर बालकामगार, बाल भिक्षेकरी, लैंगिक अत्याचार ग्रस्त बालके, हरवलेली बालके तसेच सापडलेली बालके, मदतीची आवश्यकता असलेली संकटग्रस्त बालके आढळल्यास अशा बालकांना त्वरित आवश्यक मदत कोठून व कशी मिळवून देता येईल, यासा्ठी कोठे संपर्क करावा याबाबत सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम असतो.
अशा संकटग्रस्त बालकांना त्वरित मदतीसाठी भारत सरकार, महिला व बाल विकास विभाग नवी दिल्ली व महाराष्ट्र शासनाचे महिला व बालविकास विभाग यांच्यामार्फत 0 ते 18 वयोगटातील कोणत्याही प्रकारच्या अडचणीत, संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या सर्व बालकांसाठी चाईल्ड हेल्पलाईन सेवा 1098 संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित आहे.
या सेवेअंतर्गत संकटग्रस्त बालकांना 24×7 हेल्पलाईन सेवा उपलब्ध आहे. या सेवेचा लाभ बालक स्वत: घेऊ शकतो किंवा इतर कोणीही सदर सेवेद्वारे बालकाला मदत मिळवून देऊ शकतात. त्यामुळे 1098 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करुन संकटग्रस्त बालकांना मदत करावी, असे आवाहन डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, महिला व बालविकास, महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.