जितेंद्र लखोटीया
तेल्हारा प्रतिनिधी
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ तेल्हारा तालुक्यातील अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकां ना करून देण्या साठी तेल्हारा सह गावोगावी आयोजिण्यात आलेल्या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला असून,उर्वरित ज्येष्ठांनी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’चा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार समाधान सोनवणे यांनी केले आहे.शिबिराद्वारे विशेष शिबिरांच्या माध्यमातून विविध विभागांच्या समन्वयाने गरजूंच्या अर्जांची पूर्तता करून घेण्यात आली आहे.
शिबिरांचे आयोजन करून योजनेचे अर्ज ग्रामसेवक व तलाठी यांच्यामार्फत परिपूर्ण भरून घेण्यात आले आहेत. अर्जदाराला आवश्यक प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य अधिकारी शिबिरात उपस्थित होते. जास्तीत जास्त व्यक्तींना या योजनेचा लाभ व्हावा याकरिता स्वतः तहसीलदार समाधान सोनवणे यांनी शिबिरात स्वतः भेट देवून प्रयत्न केले आहे.
योजनेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील ज्येष्ठ नागरिकांना शासनाकडून मुख्यमंत्री वयोश्री योजनेत सहाय साधने किंवा उपकरणे खरेदी करण्यासाठी, तसेच प्रबोधन- प्रशिक्षणासाठी एकवेळ एकरकमी तीन हजार रु. खात्यात प्राप्त होतात.
राज्यातील ६५ वर्ष व त्यावरील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानानुसार येणा-या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने किंवा उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र याद्वारे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या शारीरिक अक्षमतेनुसार आवश्यक साधने, उपकरणे पात्र लाभार्थ्यांच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरित करण्यात येतात.त्यातून ज्येष्ठांना चष्मा, ट्रायपॉड, स्टीक व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वायीकल कॉलर इत्यादी साधने खरेदी करता येतील, तसेच नोंदणीकृत योगोपचार केंद्र, मनःस्वास्थ्य केंद्र, मनःशक्ती केंद्र, प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल.
अर्जासोबत आधारकार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेची पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराची २ छायाचित्रे, स्वयं घोषणापत्र, शासनाने ओळखपत्र पाठविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे, उत्पन्नाचा दाखला (उत्पन्न मर्यादा २ लाख), आवश्यक साहित्याबाबत वैद्यकीय अधिकारी यांचे शिफारसपत्र आवश्यक आहेत अशी माहिती तहसीलदार समाधान सोनवणे यांनी दिली आहे.