योगेश मेहरे
अकोट
स्व.सुनंदाताई दामोदरराव ढोरे रा. मुंडगाव यांनी श्रींच्या पादुकांना साक्षी ठेवून नेत्रदान व देहदानाचा मरणोपरांत संकल्प पूर्ण केला आहे. त्यांच्या इच्छेनुसार मरणोपरांत वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे देहदान झाले. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेता येईल.व नेत्र कमलांजली रुग्णालयामार्फत दोन दृष्टी हिनांना दृष्टी मिळाली.
श्री गजानन महाराज पादुका संस्थानचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान कोषाध्यक्ष विजय ढोरे यांच्या मातोश्री श्रीमती सुनंदाताई यांनी श्रींच्या चरण पादुकांना साक्षी ठेवून वर्ष 2007 ला परम पूज्य भय्यूजी महाराज यांच्या उपस्थितीत श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव च्या यात्रा शताब्दी महोत्सवाच्या वेळी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला होता.तेथूनच पादुका संस्थानच्या मरणोत्तर देहदान अभियानाची सुरवात झाली. आता पर्यंत संस्थानच्या माध्यमातून 300 च्या जवळपास मरणोत्तर देहदान नोंदणी झाली आहे. व प्रत्यक्षातही काही देहदान झाले आहे.
श्री गजानन महाराज पादुका संस्थांन सामाजिक अभिसरणाचे तसेच उपक्रमांचे केंद्र व्हावे हा आदर्श मुंडगावच्या पादुका संस्थानने कायम ठेवला. अध्यात्मातून राष्ट्रसेवा घडावी हा माणस डोळ्यासमोर ठेवून हा संकल्प केला. अध्यात्म केवळ स्वतःच्या मुक्तीसाठी नव्हे तर समाजासाठी असावे देहदानाचे अभियान राबवणारे श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव हे राष्ट्रातील एकमेव संस्थान ठरणार आहे.
श्री झामसिंगांनी संसाराचा त्याग करून संतत्व प्राप्त केले,पादुका संस्थानची मूळ स्थापना झामसिंग राजपूत यांच्या त्यागातून झाली आहे पादुका संस्थानच्या स्थापनेसाठी झामसिंगाने स्वतःचा वाडा व शेती पूर्ण दान केली होती. त्या त्यागाच्या परंपरेनुसार अध्यात्माला विज्ञानाची सांगड घालून सामाजिक परिवर्तनाच्या प्रयत्नात ढोरे परिवाराकडून सामाजिक दायित्व निभावले गेले.
स्व. सुनंदाताई ढोरे यांच्या इच्छेनुसार तेरवी च्या रुढीपरंपरेला फाटा देत,सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प सुनंदाताई चे परिवाराने केला आहे.