बंडु शिंगटे
घुंगर्डे हादगाव
आज समाजात महिला व मुलींसोबत अनुचित घटना घडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत.मुलींनी सोशल मीडियापासून दूर राहून आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.आपले व आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या ध्येयावर प्रेम केले पाहिजे.समाजात आपल्या सर्वांना सुजाण नागरिक म्हणून वावरावे लागेल.मुलींनी अनोळखी व्यक्तींशी जवळीक करणे टाळले पाहिजे.मुलींना कोणी त्रास देत असेल तर त्यांनी तात्काळ कोणाच्याही मोबाइलवरून ११२ नंबर डायल करून पोलिसांशी संपर्क साधावा.तसेच मुलींनी प्रेम हे आपल्या आई वडिलांवर,ध्येयावर व अभ्यासावर करावे,असा सल्ला पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णाई शिंदे यांनी दिला.
पैठण येथील श्रीनाथ हायस्कूल येथे सखी सावित्री समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य शिवाजी पठाडे,स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.मनीषा सासणे,नगरसेविका शोभाताई सव्वाशे,समुपदेशक लता डमाळ,अंगणवाडी सेविका अनिता गिरगे,पालक प्रतिनिधी शितल वाघमारे,पर्यवेक्षक रामनाथ कानडे,प्रा.शिवाजी जगताप,मुख्याध्यापक संतोष खराद,उद्धव भुकेले,सुनिल चितळे,पवन खराद यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना शिंदे म्हणाल्या की,मुलींना चांगला आणि वाईट स्पर्श हा ओळखता आला पाहिजे.अशी काही परिस्थिती निर्माण झाली तर मुलींनी आई,वडील,शिक्षक,पोलीस यांच्याशी संपर्क साधला पाहिजे.मुलींनी चूक केल्यास त्यांची शाळा बंद केली जाते.अशी चूक आई वडिलांनी न करता तिचे समुपदेशन केले पाहिजे.मुलींनी मनगटात बळ ठेवून लढल पाहिजे.तुमच्या मदतीला कोणीही येणार नाही,असे ते म्हणाल्या.
यावेळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.मनीषा सासणे म्हणाल्या की,मुलींनी मोबाईलचा वापर योग्य पद्धतीने केला पाहिजे.जगातील सर्व माहिती ही आज मोबाईलवर उपलब्ध आहे.मुलींच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी मोठे योगदान दिले आहे.आपल्या मुलांना आई,वडील आणि शिक्षक यांनी चांगले संस्कार दिले पाहिजेत.या संस्कारांचे आपल्या जीवनात अंमलबजावणी करून चांगले व्यक्ती म्हणून आयुष्य जगले पाहिजे.मुलींनी स्वतःचे संरक्षण स्वतः केले पाहिजे,असे त्या म्हणाल्या.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य शिवाजी पठाडे म्हणाले की,मुलींनी शिक्षणावर भर दिला पाहिजे.मुलींनो तुमची लढाई तुम्हीच लढाईची आहे.आम्ही आपल्या सोबत आहोत.काही अडचण असेल तर आम्हाला सांगावं.आज मुलांच्या तुलनेत मुलींची गुणवत्ता ही जास्त आहे.स्त्रिया ह्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत.मुलींनी आई वडिलांचे कष्ट लक्षात घेऊन चांगले शिकणं घेणे गरजेचे आहे.समाजात मुलींच्या बाबतीत अनुचित घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे.यासाठी समाजातील प्रत्येक सामाजिक घटकाने या घटना रोखण्यासाठी पुढे आले पाहिजे,असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री काळे यांनी केले तर आभार प्रदर्शन हे रामनाथ कानडे यांनी केले.यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून श्रावण फासाटे,अनुष्का मालोरे,प्रियंका फासाटे,अमोल गरोटे हे उपस्थित होते.यावेळी पालक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.