मा.खा.अशोक नेते यांची मंचावर उपस्थिती
विनोद के नायडू
गडचिरोली:-भाजपचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह आज (दि.24) नागपूरच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन करत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांच्यासोबत मंचावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते विराजमान होते. त्यात भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा पक्षाचे निवडणूक सहसंयोजक असलेले माजी खासदार अशोक नेते हेसुद्धा मंचावर स्थानापन्न होते.
या कार्यकर्ता मेळाव्याला वरील मान्यवरांशिवाय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, निवडणूक संयोजक रावसाहेब दानवे, ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भुपेंद्रसिंह यादव हे प्रामुख्याने मंचावर विराजमान होते.
देशात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळातील कामांना जनतेपर्यंत पोहोचवून विरोधकांचे मनसुबे हाणून पाडण्याचे आवाहन यावेळी अमित शाह यांनी केले. या मेळाव्याला भारतीय जनता पक्षाचे विदर्भातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.