तालुका प्रतिनिधी
शुभम गजभिये /चिमुर
चिमूर :- क्रांती चे बिगुल वाजवणारा, इंग्रजांना भिडण्याची हिम्मत दाखवणारा, पारतंत्र्यात पहिल्यांदा स्वातंत्र्याची चव चाखणारा असे वर्णन पाठ्य पुस्तकात वाचायला बरे वाटत असले तरी या तालुक्यात फिरल्यावर पुस्तकातील वर्णन केलेला शुर लोकांचा हाच तो तालुका आहे का यावर कुणाचाही विश्वास बसत नाही.
तालुक्यातील अर्धशिक्षकी मूलभूत सोयी नसलेल्या इमारती आहेत विद्यार्थी संख्या आहे मात्र शिक्षक शाळाबाह्य कामात व्यस्त असल्याने तसेच जेथे 7 शिक्षकांची गरज आहे तिथे 3 शिक्षक शिकवायला असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य “रामभरोसे” आहे त्यामुळे कंत्राटदारांच्या सोयीसुविधा साठी आणि त्यांना संपन्न करण्यासाठी बांधलेल्या शाळा भकास अवस्थेत आहेत.
गावागावात दाखवण्यासाठी सरकारी आरोग्य उपकेंद्र बांधलेले आहेत मात्र या इमारती पाहून हुरळून जाण्याचे काहीही कारण नाही कारण या इमारती कुलूपबंद असून बाई अडली तर तिथल्या तिथे गरोदर बाईची सोडवणूक करण्यासाठी कुणीही आरोग्यसेविका उपलब्ध नाही. डाॅक्टर नसलेल्या आयुर्वेदिक दवाखान्यात कुठल्याही सोयी सुविधा औषधे उपलब्ध नाही आणि अगदी साधारण इलाजासाठी लोकांना शहराकडे धावावे लागत आहे. बहुतांश आरोग्य उपकेंद्राच्या इमारती कोंडवाडा स्वरूपात दिसत आहेत.
चिमूर तालुक्यातील 80 टक्के भाग हा कृषीआधारीत असल्याने दाखवायला पशुवैद्यकीय दवाखाने अस्तित्वात आहेत मात्र इमारतीवर लावलेल्या फलकाव्यातिरिक्त या दवाखान्याचे अस्तित्व आढळत नाही. बऱ्याच दवाखान्यात पशू चिकित्सक नाही मदतनीस नाही. या तालुक्यात मानसालाच उपचार भेटत नाही तेव्हा आम्हाला काय मिळणार म्हणून गुरे ढोरेही तक्रार करत नाहीत.
शेतकऱ्याच्या हितासाठी आम्ही राब राब राबतो असा दावा सरकार करत असले तरी आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करण्याचे भाग्य या तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभले नाही. या तालुक्यातील कृषीं कार्यालयच भाड्याच्या इमारतीत आहे. कृषी सहायक पदे रिक्त आहेत. एकवेळ आमदार पदाची निवडणुक होईल मात्र या कृषी सहा्यक नियुक्त्या केव्हा होतील हे कुणालाच माहीत नाही.
मागील काही दिवसात रस्त्याची कामे जिकडे तिकडे सुरू आहेत मात्र हे रस्ते लोकांसाठी आहेत की कंत्राटदारांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी हेच कळत नाही. नव्याने बांधलेले रस्ते 6 महिन्यात चालायच्याही लायकीचे राहिले नाहीत या रस्ते बांधकामात कंत्राटदार गिट्टी मुरूम ऐवजी कापूर वापरत असल्याने तो कापूर बहुतेक हवेत उडून जात असावा अशी तालुकाभर चर्चा आहे.
देशाचे प्रधानमंत्री यांनी जलजीवन योजनेचा गाजावाजा करत सुरुवात केली मात्र गावागावात सर्व कामे अर्धवट पडलेले आहेत या उन्हाळ्यात माय भगिनीचे काय हाल होतील काय माहीत?
एवढा मोठ्ठा तालुका मात्र या तालुक्यात उच्च शिक्षणाची काहीच सोय नाही सर्व विद्यार्थ्यांना बाहेर तालुक्यात जावे लागते. औद्योगिक क्रांती म्हणजे या तालुक्यासाठी दिवास्वप्न आहे. कारखाने खाजगी उद्योग म्हणजे नेमके काय याचा या तालुक्याशी काही संबंध नाही. उद्योगच नाही त्यामुळे रोजगार भेटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. चिमूर तालुक्यातील बेरोजगार युवकाची वारी चंद्रपूर नागपूर ते थेट पुणे नाशिक इथपर्यंत जाते मात्र त्यांच्या गृह तालुक्यात त्यांना रोजगार भेटत नाही. सध्या गावागावात सभागृहे.. सामाजिक भवन बांधण्याची फैशन आली आहे मात्र या भवनाचा उपयोग शैक्षणिक सामाजिक आरोग्य औद्योगिक प्रगतीसाठी होईल का ? यामुळे युवकांना रोजगार मिळेल का? शिक्षणाची सोय होईल का? वैद्यकीय उपचार मिळतील का? असा प्रश्न सामान्य नागरिक विचारू लागले आहेत.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या समस्यांवर लोक विचार करून मतदान करतील की नेहमीप्रमाणे जात पात धर्म दारू पैसा पार्टी यावर भुलून मतदान करतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.