शहर प्रतिनिधी
जितेंद्र लाखोटीया तेल्हारा
जागर फाउंडेशन दहा वर्षापासून निराधारांची दिवाळी सहानुभूती म्हणून नव्हे तर समानुभूतीचा आनंद देण्या व घेण्यासाठी समाज सहकार्यातून साजरी करत असते. दहा वर्षांपूर्वी ही दिवाळी साजरी करताना याचे स्वरूप छोटे असायचे. सातपुडा पर्वतरांगातील आदिवासी गरीब समुदायातील कुटुंबांपर्यंत जाऊन त्यांना दिवाळी फराळ, आरोग्य विषयक स्वच्छता साहित्य व शाळकरी मुलांना अभ्यंगस्थान करून कपडे वाटप करणे असे त्याचे स्वरूप असायचे. याला कारण म्हणजे समाजाचा मिळणारा पाठिंबा हा मोजका आमच्या मित्रपरिवारापुरता असायचा. सामाजिक संवेदना जपणाऱ्या या उपक्रमाला पुढे रद्दी संकलनातून रक्कम उभी करण्याची संकल्पना पुढे आली. दिवाळीनिमित्त होणाऱ्या घराच्या स्वच्छतेतून संकलित होत गेलेली रद्दी आनंदाने समाज देऊ लागला. त्यातून लाखो रुपये उभारल्या जाऊ लागले. काहीजण थेट रक्कम देऊन यात आपले योगदान देत सहभागी झाले. रक्कम मोठी उभी राहत असल्यामुळे निराधारांची दिवाळी उपक्रमाचे स्वरूपही बदलत गेले. रद्दी संकलनातून जमा झालेल्या रकमेतून आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथील आदिवासी शेतकरी बांधवांना 100 बैल पुरवण्यात आले. शेतकरी आत्महत्याग्रस्त आठ परिवारातील महिलांना दळण यंत्र व शिलाई मशीन देण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळेतील 1000 विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. कोरोना काळामध्ये दिव्यांग असले तरी रेल्वे स्टेशन,बस स्टॅन्डवर, रस्त्यावर विविध वस्तू विक्री करून चरितार्थ चालवणाऱ्या 25 अंध दिव्यांग कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे व्यवसाय साहित्य देण्यात आले. त्यातून हे कुटुंब स्वतःच्या पायावर सक्षम उभी राहिली. गतवर्षी 102 पायी जाऊन शिक्षण घेण्यासाठी धडपडणाऱ्या शाळकरी मुलींना सायकल वाटप करण्यात आले. एवढे मोठे महान कार्य उभे राहिले ते सामाजिक जाणीवेतून जगणाऱ्या महाराष्ट्रातील व बाहेरील महानुभावांच्या छोट्या मोठ्या योगदानातून. कुणी प्रत्यक्ष रद्दी देऊन तर कुणी थेट आर्थिक रक्कम देऊन जागर फाउंडेशनच्या या उपक्रमाला हातभार लावत गेले आणि निरर्थक ठरणारी रद्दी अनेकांचे भविष्य उभे करून गेली.यावर्षीच्या दिवाळीतही रद्दी संकलनातून उभी राहिलेली रक्कम व थेट रक्कम संवेदनशील परिवार मोठ्या आनंदाने पाठवत आहेत. पायी जाऊन शिक्षण घेण्याची इच्छाशक्ती बाळगणाऱ्या शाळकरी मुलींना सायकल भेट देण्याचे जागरने वचन दिले आहे. यासाठी लागणारी आर्थिक रक्कम मोठी असली तरी ती उभी करणे कठीण नक्कीच नाही. असंख्य परिवार आनंदाने आपले छोटे मोठे योगदान देऊन सामाजिक जीवन जगण्याची वेगळीच अनुभूती घेत असतात. आपण दिलेली रक्कम पवित्र असल्यामुळेच ती अनेकांच्या आयुष्यात आनंद पेरत असते. अडगळीतील रद्दीतून अनेकांच्या आयुष्याला उभारी मिळत असल्यामुळे मनापासून सारेच सहभागी होत आहेत. आपणही सामाजिक जाणीव जपत शक्य ते योगदान जागर फाउंडेशनच्या निराधारांची दिवाळी उपक्रमात देऊन माणुसकीचा जयजयकार करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकाल हा विश्वास आहेच.