शहर प्रतिनिधी
जितेंद्र लखोटिया ,तेल्हारा
अकोला येथील गायत्री बालिकाश्रम, मलकापूर आणि आनंदाश्रम, मोठी उमरी येथील मुलींच्या ‘ह्युमन पॅपिलोमा व्हायरसच्या मोफत लसीकरणाची’ मोहीम इंडियन मेडिकल असोसिएशन च्या ‘विमेन डॉक्टर्स विंग’ तर्फे नुकतीच राबवण्यात आली. ह्यामध्ये आनंदाश्रम येथील १२ मुलींचे आणि गायत्री बालिकाश्रम येथील ६२ मुलींचे मोफत लसीकरण ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉ. वर्षा घाटे ह्यांच्या नेतृत्वात करण्यात आले. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस लस ही विशिष्ट प्रकारच्या मानवी पॅपिलोमा व्हायरसच्या संसर्गास प्रतिबंध करणारी लस आहे. ही लस घेतल्यामुळे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग/ कॅन्सर टाळता येतो आणि इतर काही कर्करोग देखील या लसीकरणामुळे टाळता येतात. जागतिक आरोग्य संघटनेने ही लस ९ ते २६ वर्षे वयाच्या सर्व मुलींना देण्याची शिफारस आधीच केलेली आहे. भारत सरकारचा देखील ही लस सर्व मुलींसाठी मोफत उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. परंतु तूर्तास ह्या लसीची किंमत बरीच जास्त आहे, त्यामुळे सार्वत्रिक स्वरूपात ही लस सरकारतर्फे मोफत उपलब्ध होऊ शकलेली नाही. ह्या अशा महागड्या लसींचा खर्च स्वतः करून अनाथ बालिकांना त्याचा लाभ करून देण्याचे औदार्य आयएमएच्या विमेन डॉक्टर्स विंगने दाखविले. त्याबद्दल समाजाच्या सर्व स्तरातुन त्यांच्या समाजोपयोगी कृतीचे कौतुक होत आहे. अशी माहिती आयएमएच्या विमेन डॉक्टर्स विंगच्या अध्यक्षा डॉ.उज्ज्वला मापारी ह्यांनी दिली. विमेन डॉक्टर्स विंगला ह्या लसी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया तर्फे कमी किमतीत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या लसीकरणा प्रसंगी डॉ. वर्षा घाटे, अध्यक्षा डॉ. उज्वला मापारी, सचिव डॉ. अर्चना अग्रवाल, डॉ. प्रज्ञा वरठे, डॉ. तारा माहेश्वरी, डॉ. किरण गुप्ता, डॉ. श्रध्दा अग्रवाल, डॉ. शिल्पा चिराणीया, डॉ. शिल्पा कोटक तसेच सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते.