कृष्णा चौतमाल
हदगांव : १ ते ३ सप्टेंबरदरम्यान हदगाव तालुक्यातील निवघा, कोळी, तळणी परिसरात अतिवृष्टीमुळे नदी, नाल्यांना पूर येऊन खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. पिकांचे नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांनी विमा कंपनीला ७२ तासाच्या आत ऑनलाईन तक्रार करून कळवायला पाहिजे, असा कंपनीचा नियम आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे ७२ तासांच्या आत कळवले; परंतु विमा कंपनीचा प्रतिनिधी फिरकले नाहीत.
आता खरीप हंगामातील पिके निघाली. शेतकरी रब्बी हंगामाच्या पेरणीला लागले आहेत. आता पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करायला येत आहेत. आता शेतकरी पीक कुठले दाखवणार हा प्रश्न निर्माण होत आहे. जसा शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या पिकांची माहिती द्यायला फक्त ७२ तासांचा अवधी आहे. तसा नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करायला काही ठरावीक अवधी नाही का, असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहेत. काही ठिकाणी नुकसानीचे पंचनामे महसूल विभाग आणि विमा कंपनीने दीड महिन्यापूर्वी करून वरिष्ठांना अहवाल सादर केला.